गायत्री परिवारतर्फे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य* *यांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे ७ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजन
पुणे :
अखिल विश्व गायत्री परिवार तर्फे विचारक्रांती अभियानांतर्गत सेवा शांतिकुंज हरिद्वारचे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य (१९११ ते १९९०) यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. ७ ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहात सकाळी ९ ते रात्री ९.३० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, अशी माहिती गायत्री परिवारचे राजेश टेकरीवाल, हेमंत जोगळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हरिद्वार येथील प्रा. विश्वप्रकाश त्रिपाठी, गायत्री परिवाराच्या प्रतिभा मुळे, विनोद पटेल, पद्माकर लांजेवार आदी उपस्थित होते.
राजेश टेकरीवाल म्हणाले, “आचार्यांनी गायत्री मंत्राच्या साधनेद्वारे माणसाचे परिवर्तन घडवून यावे, त्याची प्रतिभा जागृत व्हावी, चांगले विचार व चांगल्या कर्माकडे माणसाचा प्रवास होत रहावा, त्यातून कुटुंब, समाज व राष्ट्र देखील सकारात्मक ऊर्जेने भरून जावे व विश्वातील सर्व घटकांनी भेदाभेद विसरून, एकत्र येऊन आपले कल्याण करून घ्यावे, या उद्देशाने जन्मभरात सुमारे ३२०० पुस्तकांचे लेखन केले.जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय सांगणारी ही पुस्तके आहेत. आत्मबल, मनोबल वाढवून तणावातून मार्ग कसा काढावा, याविषयी ही पुस्तके मार्गदर्शनपर आहेत. सामाजिक काम करणार्यांनाही ती उपयुक्त आहेत. हा सर्व द्न्यानाचा खजिना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विचारक्रांती अभियानाच्या माध्यमातून या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अतिशय सवलतीच्या दरात ही पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार आहेत.”
हेमंत जोगळेकर म्हणाले, “आचार्यजींनी आपल्या लेखनातून मानवी समाजापुढे ‘मानवात देवत्वाचा उदय व पृथ्वीवर स्वर्गाचे अवतरण’ हेच ध्येय ठेवले आहे. देह ठेवण्याआधी सुमारे पाच वर्षे त्यांनी क्रांतिधर्मी साहित्य या नावाने विशेष पुस्तके लिहिली. त्याद्वारे येणाऱ्या नवीन युगासाठी त्यांनी मानवतेला उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवला आहे. युगऋषी पंडित श्रीराम शर्मा यांच्या पुस्तक प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष आहे. युगऋषी यांनी आपल्या ८० वर्षांच्या तपस्वी जीवनात ३२०० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. याबरोबरच चार वेद, १०८ उपनिषदे, श्रुती व इतर ग्रंथांवर अभ्यास करुन सर्वसामान्यांना समजेल, अशा स्वरुपात त्याची मांडणी केली आहे.”
हे प्रदर्शन विद्यार्थी, समाजसेवक, अध्यात्म मार्गावरील साधक, देश प्रेमी, संस्कृती प्रेमी अशा सर्व लोकांसाठी नवीन प्रेरणा देऊन, योग्य मार्गदर्शन करणारे ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो. गायत्री महाविज्ञान हा हिंदीतील तीन खंडात असलेला- गायत्री मंत्र व साधना विषयीचा विश्वकोश समजला जाणारा- ग्रंथ मराठी भाषेत एकत्रित स्वरूपात या प्रदर्शनात उपलब्ध केला जाणार आहे. भारतीय संस्कृतीची बीजे तरुण पिढीमध्ये उतरावीत, यासाठी परिवाराच्या वतीने शाळा, महाविद्यालयांतून भारतीय संस्कृती ज्ञान परिक्षा आयोजित करण्यात येते. राजस्थान व छत्तीसगड या राज्यांनी तर ही परिक्षा शाळांमधून अनिवार्य केली आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
—————————–
पत्रकार परिषदेत माहिती देताना पद्माकर लांजेवार, विनोद पटेल, विश्वप्रकाश त्रिपाठी, राजेश टेकरीवाल, प्रतिभा मुळे, हेमंत जोगळेकर.