*यशस्वी उद्योजक होण्यासाठी वेळेचे नियोजन हवे*
– विवेक गोळे यांचे मत; मराठवाडा मित्र मंडळात ‘यशस्वी उद्योजकाशी संवाद’ कार्यक्रम
पुणे : “व्यवसाय क्षेत्राकडे केवळ आवड म्हणून न पाहता, जबाबदारी घेऊन काम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी व्यवसायाचा ध्यास, वेळेचे नियोजन, कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. सारासार विचार करून आपल्या व्यवसायाची निवड करावी,” असे मत ज्येष्ठ उद्योजक व भाग्यश्री टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक गोळे यांनी व्यक्त केले.
मराठवाडा मित्र मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात व्होकेशनल विंग आयोजित ‘यशस्वी उद्योजकाशी संवाद’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गोरे बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, प्राचार्य प्रा. देविदास गोल्हार, उपप्राचार्य रमेश पंडित, पर्यवेक्षक आर. व्ही. खजुरे, प्रा. अनिल भोसले, प्रा. राकेश ठिगळे आदी उपस्थित होते.
विवेक गोळे म्हणाले, “महाराष्ट्राला निसर्गाने अथांग समुद्र किनारा दिलेला आहे. तेथे पर्यटन व्यवसायाला खूप संधी आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही पर्यटन व्यवसाय करू शकता. ग्राहकांना उत्तम सोयी दिल्या, तर भविष्यात पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत. काही देश हे फक्त पर्यटन उद्योगावर अवलंबून आहेत. व्यवसायाला बदलत्या तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे.”
प्रा. देविदास गोल्हार म्हणाले, “व्यावसायिक अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक होण्याची इच्छा निर्माण होते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळात व्होकेशनल विभागाने हजारो उद्योजक निर्माण केले आहेत व ते आज यशस्वीपणे उद्योग सांभाळत आहेत.”
महाविद्यालयातील हॉस्पिटॅलिटी व टुरिझम मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम पूर्ण करून यशस्वी उद्योजक झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार गोळे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. कुंदन पवार, प्रा. सुनिल पवार यांनी केले. ज्येष्ठ शिक्षिका डॉ. सुजाता शेणई यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनिल भोसले यांनी आभार मानले.
——————————————