*कल्लोळातही सहीसलामत राहण्यासाठी माध्यम साक्षरता, तारतम्य गरजेचे*
अतुल पेठे यांचे प्रतिपादन; मनोविकास प्रकाशनातर्फे नीलांबरी जोशी लिखित ‘माध्यम कल्लोळ’ ग्रंथाचे प्रकाशन व मुक्तसंवाद
पुणे : “माध्यमे ही जशी जागृतीची साधने आहेत, तशी ती भीतीची दुकानेही आहेत. माध्यमांमधील हा कल्लोळ पूर्वीपासून आहे. त्यामुळे माध्यमांना दोष देण्याऐवजी त्यातले चांगले-वाईट समजून घ्यायला हवे. त्यासाठी तारतम्य बाळगत, मधली ओळ वाचत आपण माध्यम साक्षर व्हायला हवे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य-दिग्दर्शक अतुल पेठे यांनी केले.
मनोविकास प्रकाशनातर्फे नीलांबरी जोशी लिखित ‘माध्यम कल्लोळ’ ग्रंथाचे प्रकाशन व मुक्त संवादात अतुल पेठे बोलत होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदमजी सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी अभिनेते गिरीश कुलकर्णी, माध्यम अभ्यासक समीरण वाळवेकर, ज्येष्ठ पत्रकार रवि आमले, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी उपस्थित होते.
अतुल पेठे म्हणाले, “बाह्यजगात आपल्याला उत्पादन आणि ग्राहक म्हणून वापरले जाते. हिंसा आणि लैंगिकता माध्यमाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. त्यातून अनेकदा मानसिक आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. अशावेळी आपल्यातील विवेक जागृत ठेवायला हवा. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपण बदल स्वीकारले पाहिजेत. जीवनशैली बदलली, तरी जीवनमूल्ये बदलता कामा नयेत. तसे झाले तर आपण या कल्लोळातही सहीसलामत राहू शकतो.”
गिरीश कुलकर्णी म्हणाले, “सद्यस्थितीत माध्यमांत माहिती आणि कलकलाट अधिक आहे. आपल्या आकलन, अनुभवाइतकेच आपण बोलावे. ग्राहककेंद्री माध्यमात रोज नवे भोग करून विकले जातात. जगण्याची स्पर्धा, भांडवलाची गरज यामुळे हा कल्लोळ सातत्याने होत राहील, त्यात आपण किती बुडायचे हे प्रत्येकाने ठरवावे. माणूस बनण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु असते. या कल्लोळापासून जे दूर आहेत, ते आजही खळाळून हसतात. आनंदी जीवन जगतात.”
समीरण वाळवेकर म्हणाले, “माहिती आणि बातमी यात फरक आहे. सध्या ब्रेकिंगच्या जमान्यात खऱ्याचा आभास निर्माण करून ती बातमी पोहोचवली जाते. त्यातून फेक न्यूज प्रतिबिंबित होते. आपण माध्यम साक्षर आहोत हा भ्रम आहे. विकृत प्रयोगातून निर्माण झालेले उत्पादन आपल्यापर्यंत येऊ द्यायचे नसेल, तर आपण माध्यम साक्षर होण्याची गरज आहे.”
रवि आमले म्हणाले, “असत्य, अर्धसत्य हा प्रपोगंडाचा पाया असून, माध्यमे त्याचे वाहक आहेत. परंतु माध्यमांचे व्यवस्थापन चालण्यासाठी जाहिराती गरजेच्या आहेत. अर्थकारण जुळत नसल्याने माध्यमातील अनेक लोक दरिद्री अवस्थेत आहेत. त्यामुळे वाचक, प्रेक्षक म्हणून आपण जागृत राहून त्यातील चांगले ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
अरविंद पाटकर म्हणाले, “वाचनसंस्कृती लोप पावतेय, हा माध्यमातून होणारा अपप्रचार आहे. आपण वाचकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतो. ही दुरावस्था थांबवण्यासाठी वाचकांनी जागृतपणे पुस्तके वाचली पाहिजेत. लोकांपर्यंत पुस्तके पोहोचण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पुस्तकांवरील जीएसटीमध्ये सवलत द्यावी. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यात ललित साहित्याचे दुकान नाही, याची खंत वाटते.”
माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद पाटकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.
————————————–
‘माध्यम कल्लोळ’ उलगडताना…
“सर्वच प्रकारच्या माध्यमांचा जनमानसावर होणारा परिणाम यात मांडला आहे. मालिका, चित्रपट, प्राईम टाइम, ओटीटी प्लॅटफॉर्म, अटेंशन इकॉनॉमी, सनसनाटी बातम्या, जाहिराती, मोबाईल, इंटरनेट, स्क्रीन अॅडिक्शन, नोमोफोबिया, आत्मकेंद्री, सेल्फी, टेक्नोफेरन्स, सायबर बुलिंग, ट्रोलिंग अशा गोष्टींचा परिणाम समाजावर होतो. लाईक्स, कमेंटला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यातून सायबर गुन्हेगारी वाढीस लागते. या कल्लोळात आपणही बुडतो आहोत, या गोष्टी लक्षात येत नाहीत. अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह यात केला आहे.”
– नीलांबरी जोशी, लेखिका
————————————–
१) मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड : ‘माध्यम कल्लोळ’ ग्रंथाच्या प्रकाशनावेळी डावीकडून अरविंद पाटकर, गिरीश कुलकर्णी, समीरण वाळवेकर, नीलांबरी जोशी, अतुल पेठे व रवि आमले.
२) मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड : ‘माध्यम कल्लोळ’ ग्रंथाच्या प्रकाशनावेळी झालेल्या मुक्तसंवादात डावीकडून गिरीश कुलकर्णी, समीरण वाळवेकर, अतुल पेठे, रवि आमले व नीलांबरी जोशी.