अमेरिकेच्या बोस्टन शहरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवंत देखाव्यासह अमेरिकेत निघाली मिरवणूक; भारतमातेचा जयघोष अन मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन
बोस्टन : देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. अमेरिकेच्या बोस्टनमध्येही तेथील भारतीयांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला. तेथे स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
अल्बानी ढोल ताशा पथक (अल्बानी, न्यूयॉर्क) आणि संकल्प मराठी मंडळ (बोस्टन) यांनी आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बहारदार कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये बोस्टन शहरावर अमेरिका-भारताचा ध्वज असलेले 220 फुटी विमान, बोस्टन हार्बर येथे ध्वजारोहण, बँडपथकासह मिरवणूक आणि भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे फ्लोट यांचा समावेश होता.
या समारंभाचा पहिल्या दिवशी बोस्टन (मॅसॅच्युसेट्स, अमेरिका) मधील क्रिस्टोफर कोलंबस पार्क येथे भारतीय-अमेरिकन लोकांनी 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत 32 देशांतील नागरिकांसोबत भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा काले. देशभक्तीपर थीम असलेले फ्लोट्स, प्रदर्शन आणि भारतीय नृत्य यांचा समावेश होता.
या एकूण 15 फ्लोट्स होते. त्यात एक महाराष्ट्र फ्लोट होता. प्रत्येक फ्लोटने भारतातील विविध राज्यांतील वैविध्य दाखवले. त्यातील सहभागींनी महान ऐतिहासिक शासक, स्वातंत्र्यसैनिक आणि विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी, आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. महाराष्ट्राच्या फ्लोटमध्ये महाराष्ट्रीय कुटुंब आणि विद्यार्थी सहभागी झाले. या फ्लोटद्वारे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाबाई आणि स्वराज्यांच्या मावळ्यांचे दर्शन घडविण्यात आले.
महाराष्ट्राच्या फ्लोटचे श्रेय अल्बानी ढोल ताशा पथक (अल्बानी, न्यूयॉर्क) आणि संकल्प मराठी मंडळ (बोस्टन) या दोन संस्थांच्या 150 सदस्यांच्या टीमला जाते. या दोन्ही संस्था उत्तर अमेरिकेतील महाराष्ट्रीय कुटुंबांना महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी उद्देशाने एकत्र आणत आहेत.
…………
आपल्या बांधवाना एकत्र आणणे तसेच आपल्या पुढच्या पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी ही कळकळ या उपक्रमामागे आहे.
– संदीप जाधव, संकल्प मराठी मंडळ
……..
‘एक संकल्प मराठी जपण्याचा’ हे ऑल्बनी ढोलताशा पथकाचे घोषवाक्य आहे. मानवी इतिहासात छत्रपती शिवरायांसारखा शूर धाडसी राजा झाला नाही. रयतेच्या स्वराज्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या या विश्ववंदनीय राजाला बोस्टन-अमेरिका येथे भव्य रथातून जिवंत देखाव्याद्वारे मानवंदना देण्याची संधी मिळत असल्याबद्दल मनात खूप आनंद आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सातासुमद्रापार जपताना खूप अभिमान वाटतो.
– कल्याण घुले, संस्थापक अध्यक्ष, ऑल्बनी ढोलताशा पथक, न्यूयार्क
……………..