*ईडीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे रेल रोको आंदोलन*
पुणे : मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. २७) खडकी रेल्वे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे-लोणावळा लोकल रोखत केंद्र सरकारचा व ईडीचा निषेध केला.
या आंदोलनात राष्ट्रीय सरचिटणीस मितेंद्र सिंग, प्रतिमा मुदगल, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, प्रथमेश आबनावे, पुणे शहर अध्यक्ष राहुल शिरसाठ, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कौस्तुभ नवले, प्रदेश सचिव उमेश पवार, अनिकेत नवले, अनिकेत अरकडे, सौरभ अमराळे, अक्षय माने, अजित ढोकळे, राकेश मारणे आदी उपस्थित होते.
केंद्रातील मोदी सरकार सूड भावनेने वागत आहे. सोनियाजींना केवळ मानसिक त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना मागे लावले जात आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर आणि जनहिताचे काम करणाऱ्या सोनिया गांधींना ईडीच्या कार्यालयात बोलावल्याचा निषेधार्थ येथे रेल रोको आंदोलन करण्यात आल्याचे मितेंद्र सिंग यांनी सांगितले.