Friday, September 19, 2025
HomeMarathi news*'माणूस'पण जगलेल्या चाफेकरांचे जीवन प्रेरणादायी* रेणू दांडेकर यांची भावना; विलास चाफेकर...

*’माणूस’पण जगलेल्या चाफेकरांचे जीवन प्रेरणादायी* रेणू दांडेकर यांची भावना; विलास चाफेकर यांच्या स्मृतीदिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन

*’माणूस’पण जगलेल्या चाफेकरांचे जीवन प्रेरणादायी*

रेणू दांडेकर यांची भावना; विलास चाफेकर यांच्या स्मृतीदिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : “वंचितांच्या मनात विकासाची परिकल्पना रुजवण्याचे काम विलास चाफेकर यांनी केले. त्यांचे विचार, मांडणी आणि काम अनुभवातून होते. शरीरत्याग केलेल्या चाफेकर यांचे विचार चिरतरुण आहेत. थेंबाथेंबात ‘माणूस’ म्हणून जगलेल्या चाफेकरांचे जीवन प्रेरणादायी आहे. माझे काम हे समाज करून घेतो, या विचारांतून ते अखेरपर्यंत काम करत राहिले,” अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू दांडेकर यांनी व्यक्त केली.

‘वंचित विकास’चे संस्थापक विलास चाफेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांच्यावरील ‘प्रिय सर’, तसेच त्यांनी लिहिलेल्या ‘पाया समाजकार्याचा’ व ‘बलात्कार : एक समस्या’ या पुस्तकांचे प्रकाशन रेणू दांडेकर, लेखिका प्रतिभा गुंडी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ यांच्या हस्ते झाले. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष तानाजी गायकवाड, शासकीय अधिकारी वैशाली नवले, मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ, मीनाक्षी नवले, तृप्ती फाटक आदी उपस्थित होते.

रेणू दांडेकर म्हणाल्या, “चाफेकर यांच्यासारखी माणसे आपल्यात नसली, तरी ती विचाराने कायम सोबत असतात. फार भेटत नसलो, तरी दिवसरात्र गप्पा मारायचो. त्यांचे विचार लिखित स्वरूपात आणण्यासाठी सतत बोलायचे. उणिवाकडे न पाहता चांगले ते पहावे, शिकावे आणि पुढे निघावे. श्रध्दा व्यक्तीवर नाही तर कामावर असावी. विलासने तुमच्या-आमच्यात एक बीज टाकले आणि ते अंकुरते आहे. समाजाच्या गरजा ओळखून काम करणे, समाज कुठे पोहचला हे ओळखून काम थांबवणे आणि कामातून अलगद बाजूला होणे फार अवघड असते.”

आनंद सराफ म्हणाले, “कार्यकर्त्याची मानसिकता विचारात घेत सर काम करत. स्वातंत्र्यपूर्व काळात घरदार सोडून येणारे कार्यकर्ते होते. स्वातंत्र्यानंतर सुराज्य प्राप्तीसाठी संघटना निर्माण होत गेल्या. १९९० नंतर मात्र भांडवलशाही, अर्थकारणाचे वादळ घोंगावत असताना मानसिकता बदलली. या सगळ्याचा विचार सरांनी आपल्या पुस्तकात मांडला आहे. कार्यकर्ता कसा असावा हे चाफेकर स्वतः जगले आहेत. काम कसे करावे याचे शब्दरूप म्हणजे हे पुस्तक आहे.”

प्रतिभा गुंडी म्हणाल्या, “बलात्कार हा विषय खूप नाजूक, त्रासदायक, भयावह आहे. या बायकांना चांगले स्थान मिळवून देणे हे समाजाची जबाबदारी आहे. स्त्रीला मान हा पुरुषांनी द्यायलाच हवा. दोन्ही समाजाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत.”

मीना कुर्लेकर यांनी सरांच्या अखेरच्या दिवसातील आठवणी, त्यानंतर त्यांच्या विचारांचा ठेवा जपताना निर्मिलेली पुस्तके याविषयी प्रास्ताविकात सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments