रमणबागमध्ये तंत्रशिक्षण कौशल्य विकास अभ्यासक्रम
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (रमणबाग) नवीन शैक्षणिक धोरणानुसार पाच तंत्रशिक्षण कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करीत असल्याची माहिती शाला समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक पलांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, सदस्य डॉ. आशिष पुराणिक, मुख्याध्यापक सुनील शिवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पलांडे म्हणाले, ‘पाचवीसाठी संस्कार वर्ग, सहावीसाठी नाट्यशास्त्र वर्ग, सातवीसाठी रोबोटिकस्, आठवीसाठी टेराकोटा आणि जर्मन, जापनीज या परकीय भाषा आणि नववीसाठी संगणक जोडणी व देखभाल हे नवीन अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहेत.’
ते पुढे म्हणाले, ‘नाट्यशास्त्र अभ्यासक्रमासाठी विवेकानंद सभागृहाचे छोट्या नाट्यगृहात रुपांतर करण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालयात ध्वनिमुद्रण स्टुडिओ उभारण्यात आला आहे. रोबोटिकस्, संगणक, भाषा, गणित आणि विज्ञानाच्या प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत. प्रशालेतील सर्व वर्गांमध्ये इंटरनेटची जोडणी करण्यात आली आहे. शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणगीमधून हे प्रकल्प करण्यात आले. माजी विद्यार्थी डॉ. प्रमोद चौधरी यांनी शाळेला 51 लाख आणि 75 लाख अशी देणगी दिली. माजी विद्यार्थ्यांकडून 12 लाख 44 हजारांची देणगी प्राप्त झाली. त्यातून हे प्रकल्प करण्यात आले.’
डॉ. कुंटे म्हणाले, ‘डीईएसमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहील अशा प्रकारची रचना करण्यात येत आहे. संस्थेच्या सर्व शाळांमध्ये तंत्रशिक्षण कौशल्याचे दोन किंवा तीन विषय शिकविले जाणार आहेत. दर शनिवारी दोन तास या विषयांचे शिक्षण दिले जाणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात अडीच कोटी रुपयांच्या देणगीतून इनक्यूबेशन सेंटर उभारण्यात आले आहे. व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज असून त्यासाठी डीईएस इतर सहयोगी शिक्षण संस्थांना बरोबर घेऊन जाणार आहे.’
डॉ. आशिष पुराणिक यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील तंत्रशिक्षण कौशल्याची माहिती दिली. धनंजय कुलकर्णी यांनी नवीन सुविधा व अभ्यासक्रमांचा दैनंदिन उपयोग याची माहिती दिली. सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक सुनील शिवले यांनी आभार मानले.