- *सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘दर्यासारंग’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित*
पुणे, ३ एप्रिल २०२३- फर्जंदच्या यशानंतर डॉ. अनिरबान सरकार निर्मित आणि डेक्कन एव्ही मीडिया प्रस्तुत ‘दर्यासारंग’ या चित्रपटाचा मोशन पोस्टर आणि पोस्टर अनावरण सोहळा पार पडला. या चित्रपटाचे निर्माते डॉ. अनिरबान सरकार यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले
याप्रसंगी डॉ अनिरबान सरकार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असे अनेक अपरिचित मावळे आहेत ज्यांची वीरगाथा, त्यांचं शौर्य आजच्या तरुणाई समोर येणं महत्त्वाचं आहे. फर्जंदमधून कोंडाजी फर्जंद यांची शौर्यगाथा समोर आल्यानंतर अनेकांनी त्यावर संशोधन केलं. आणि आता मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आहे”
“शिवाजी महाराजांचा योग्य इतिहास तरुणाई समोर येणं गरजेचं आहे. पुढच्या काही दिवसातच लेखक, दिग्दर्शक, प्रमुख कलाकार यांची नावं जाहीर करू. आणि या चित्रपटानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशाच अपरिचित मावळ्यांची वीरगाथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा मानस आहे. फर्जंद प्रमाणे दर्यासारंगलाही प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा आहे” असे डॉ. अनिरबान सरकार म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन बागेश्री पारनेरकर हिने केले. आभार प्रदर्शन डेक्कन एव्ही मीडियाच्या साची गाढवे यांनी केले. कार्यक्रमाला डेक्कन एव्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे, अनिमेश सरकार , तंत्रज्ञ टीम आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
( डेक्कन एव्ही मीडिया प्रस्तुत ‘दर्यासारंग’ या चित्रपटाचा मोशन पोस्टर आणि पोस्टर अनावरण सोहळा प्रसंगी (डावीकडून)अजय कांबळे, अनिमेश सरकार आणि चित्रपटाचे निर्माते डॉ अनिरबान सरकार)