*सतीश मिसाळ फाउंडेशन च्या ब्रिक आर्किटेक्ट कॉलेजचा पदवी प्रदान सोहळा पुणे*
*गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर सेवेसाठी आर्किटेक्टची दूरदृष्टी आणि योग्य तंत्रज्ञान महत्त्वाचे*
*केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी*
बांधकामासारख्या क्षेत्रात किफायतशीर दरात गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आर्किटेक्टची दूरदृष्टी आणि योग्य तंत्रज्ञान महत्त्वाचे असल्याचे मत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्च्या आर्किटेक्चर आणि इंटेरिअर डिझायनिंग विद्यार्थ्यांच्या पदवीप्रदान समारंभात गडकरी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधत होते.
फाउंडेशनच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, विश्वस्त दीपक मिसाळ, संस्थापक संचालिका डॉ. पूजा मिसाळ, प्राचार्या पूर्वा केसकर, मानसी देशपांडे, मनोज देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार मिसाळ यांच्या हस्ते पदवी प्रदान समारंभ झाला.
गडकरी पुढे म्हणाले, ‘रस्ते, बोगदे निर्मितीच्या पायाभूत सुविधा आणि बांधकामासारख्या व्यवसायात आर्किटेक्टची भूमिका मह्त्त्वाची असते. या क्षेत्रांचा राष्ट्रीय उत्पन्नातील जीएसटीचा वाटा सर्वाधिक असून, रोजगार निर्मितीचे सर्वाधिक योगदान आहे. प्रधानमंत्री आवास सारख्या योजनेत किफायतशीर दराबरोबर गुणवत्ता किंमत महत्त्वाची असते. त्यासाठी नाविन्यता, उद्योजकता, संशोधनाबरोबर टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करणे महत्त्वाचे आहे. आर्किटेक्टने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि सर्वेात्तम पद्धतींचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण विकास घडविला पाहिजे.’
आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘आर्किटेक्ट हे देशाचे भविष्य आहे. या क्षेत्रात खूप मोठे भवितव्य आहे. अथक परिश्रमातून युवकांनी जगाला भारताची ताकद दाखवून दिली पाहिजे. आपल्या शिक्षणाचा देशासाठी आणि समाजासाठी उपयोग झाला पाहिजे.’
डॉ. पूजा मिसाळ म्हणाल्या, ‘ब्रिक इन्स्टिट्यूटची केवळ नऊ वर्षांत राज्यातील आर्किटेक्टमधील अग्रेसर महाविद्यालय अशी ओळख निर्माण झाली आहे. संस्थेने ब्रिक ईटीसी कंपनीच्या हायब्रिड एज्यु-टेक माध्यमातून 20 ऑनलाइन कोर्सेस सुरू केले असून, त्यामुळे नाविन्याच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना सर्जनशील क्षेत्रांची ओळख होत आहे. विद्यार्थ्यांना आपला कल लक्षात घेऊन आवडीच्या शिक्षण शाखेत प्रवेश घेण्यासाठी मदत होत आहे.’
प्राचार्या केसकर यांनी प्रास्ताविक आणि प्रा. रमा राघवन यांनी सूत्रसंचालन केले