Friday, November 8, 2024

*शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती एका क्लिकवर*

*शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती एका क्लिकवर*

*शासनाला गतीशील, पारदर्शी आणि जबाबदार ठरवणाऱ्या वेबसाईटची सुरुवात*

*महाबनी डॉट इन (www.mahabany.in) संकेतस्थळाचे थाटात लोकार्पण, घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा*

नागपूर : शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारी महाबनी डॉट इन वेबसाईट ही बेनिफिट फ्रॉम होम क्रांतीची सुरुवात आहे. तुमच्या घटनात्मक हक्काला घरबसल्या न्याय देतानाच शासन गतिशील, पारदर्शी आणि आणखी जबाबदार करणारी ही प्रक्रिया आहे. सामान्यातल्या सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची हमी घेणाऱ्या या वेबसाईटचे (संकेतस्थळाचे) लोकार्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना म्हणजे…”बेनीफिट फॉर्म होम” क्रांतीची सुरुवात असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. याची संकल्पना कुणाल राऊत (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस), टेक्निकल सपोर्ट पिक्सलस्टॅट संस्था तसेच सहकार्य बी. एन. सी. पॉवर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील एका शानदार सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचा आज भव्य शुभारंभ झाला. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाबनी डॉट इन या वेबसाईटची सुरुवात आज त्यांच्या हस्ते करण्यात आली. नागपूर जिल्हा प्रशासनाने पिक्सलस्टॅट संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने सुरू केलेली ही वेबसाईट एका क्‍लिकवर सर्व शासकीय योजनांचा लाभ देणार आहे. या वेबसाईटचे कामकाज आजपासून सुरू झाले आहे. या वेबसाईटचे लोकार्पण करताना ते बोलत होते.

आमच्या एका पिढीने शासकीय कार्यालयात योजनांचा लाभ घेताना उंबरठे झिजवले आहे. मात्र, उंबरठे झिजवणे ही प्रशासनातील परंपरा हद्दपार झाली पाहिजे शासन आणखी गतिशील व्हावे, पारदर्शी व्हावे, जबाबदार व्हावे, अशी भूमिका या प्रकल्पामागे आहे. 15 दिवसाच्या आत लाभार्थ्यांनी दिलेल्या अर्जावर कारवाईची अपेक्षा यामध्ये करण्यात आली आहे. हे काम पंधरा दिवसात झाले नाही तर याठिकाणी दप्तर दिरंगाई होत आहे हे लक्षात येईल. ही माहिती जिल्हाधिकारी व त्यांच्या मार्फत संबंधितांच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादेत प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळावा यासाठीची ही तांत्रिक बांधणी आहे.

या वेबसाईटचा शुभारंभ करण्यामागे कोरोना काळात ठप्प झालेले प्रशासन व लाभार्थी यांच्यातील वेदना असल्याचे सांगितले. कुणाल राऊत या माझ्या मुलाने अशा परिस्थितीतही शासन गतिशील राहू शकते. लाभार्थ्यांना देखील घरबसल्या त्यांचा नियमित लाभ मिळू शकतो. हे तांत्रिकदृष्ट्या आपल्याला पटवून सांगितले. त्यानंतर वर्षभर एक टिमच यासाठी कार्यरत आहे. आज प्रत्यक्षात सामान्य नागरिकांसाठी ही योजना कार्यरत होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे खेड्याकडे चला. ग्रामीण भागातील नागरिकांना तत्परतेने न्याय मिळावा. यासाठी ही योजना आणखी कामी येईल. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात याव्यात. तसेच तरुणांना अधिकाधिक या माध्यमातून न्याय मिळावा,अशी अपेक्षाही डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी राज्य शासनाच्या लोकसेवा हमी कायद्याचा हा डिजिटल अविष्कार असून उपराजधानीत त्याची सुरुवात होत असल्याचा आनंद व्यक्त केला. हजारो वेबसाईट असताना या वेबसाईटचे काय काम ? असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होऊ शकतो. मात्र, ही वेबसाइट इतरांपेक्षा वेगळी आहे. कारण याठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करता येतो. दाखल केलेला अर्ज प्रशासनाला माहिती पडतो. या अर्जावर कोणतीही कारवाई झाली अथवा नाही याची माहिती प्रशासनाला मिळते. पंधरा दिवसात संबंधित विभागाला ती कारवाई पूर्ण करण्याचे बंधन याठिकाणी घालण्यात आले आहे. सोबतच तुम्ही केलेल्या अर्जाचा मेसेज सुद्धा आपल्याला मोबाइलला येतो. त्यामुळे गतिशीलता, पारदर्शिता आणि जबाबदारी सगळ्याच बाबतीत ही वेबसाईट उजवी ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार अभिजित वंजारी यांनी देखील संबोधित केले. नागपूर सारख्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना महत्त्वाच्या कार्यालयात पोहोचण्यात अडचणी होतात. अनेक कार्यालयात पोहोचू शकत नाही. अशावेळी ऑनलाईन पद्धतीने आपली कामे होत असेल तर यासारखा आनंद नसतो. नव्या पिढी सोबत जुनी पिढी देखील आता ऑनलाईन पद्धतीच्या कामकाजात आनंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्याला दिल्याबद्दल यावेळी त्यांनी डॉ. राऊत यांचे कौतुक केले.

पिक्सलस्टॅट संस्थेचे संचालक महेश मोटकर यांनी यावेळी ही वेबसाईट कशा पद्धतीने काम करणार या संदर्भातील प्रात्यक्षिक दिले. गेल्या वर्षभर यामध्ये अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्यातल्या सामान्य नागरिकाला सुलभतेने वापरता येईल अशा पद्धतीची ही वेबसाईट तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी केले.

या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसोबत आमदार अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, बीएमसी पावर लिमिटेडचे गिरीश चौधरी, पिक्सलस्टॅट (PIXELSTAT) चे संचालक महेश मोटकर , नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड याशिवाय विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles