*विद्यार्थी, शिक्षक व इतरांकडून सूर्यदत्त परिसरातील ५०० झाडांना राखी बांधण्याचा उपक्रम.*
भावा-बहिणीच्या नात्यातील वीण घट्ट करण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. झाडे आपल्याला संरक्षण, ऑक्सिजन देतात. आपले नैसर्गिक पोषण करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि हे अनोखे नाते अधिक दृढ व्हावे, यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. वृक्ष-रक्षाबंधनातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे नाते जपत ५०० झाडांना राखी बांधली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ देशी, औषधी झाडे लावण्यात आली. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये शाळा व महाविद्यालयातील ५०० विद्यार्थिनी, महिला शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या भावांना (झाडांना) राखी बांधली. तर ‘हर घर तिरंगा’च्या धर्तीवर ‘हर वृक्षपर तिरंगा’ हा नारा देत ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थी व पुरुष कर्मचाऱ्यांनी झाडांवर झेंडा उभारला. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्यासह सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.