*रिपब्लिकन चळवळ पुन्हा वैभवशाली करायचीच*
*प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे प्रतिपादन*
फॅशन करा, लिपस्टिक लावा, मॉडर्न राहा; पण आंबेडकरी चळवळीतील आंदोलनाला उपस्थित राहा. आपण नेते असू तर आपल्या घरातील सगळे सदस्य या आंदोलनात सहभागी झालेच पाहिजेत. रिपब्लिकन चळवळ खऱ्या अर्थाने तरुणांच्या खांद्यावर आली पाहिजे. रिपब्लिकन चळवळ पुन्हा वैभवशाली झालीच पाहिजे, असे • प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.
शाहू-फुले-आंबेडकर मंचतर्फे गुरुवारी (दि. २३) एस. एम. जोशी सभागृहात आयोजित रिपब्लिकन रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यंदाचा रिपब्लिकन रत्न पुरस्कार रिपब्लिकन चळवळीचे युवा नेते आणि रिपब्लिकन युवा मोर्चाचे संस्थापक राहुल डंबाळे यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र, संत तुकोबारायांची पगडी, शाल आणि गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी डॉ. श्रीपाद सबनीस, अॅड. रमेश राठोड, सुवर्णा डंबाळे, उमेश चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड यांची उपस्थिती होती. चळवळीप्रति निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांची मी पत्नी झाले याचा मला खून अभिमान आहे, असे मत सुवर्णा डंबाळे यांनी व्यक्त केले. राहुल डंबाळे यांनी पुरस्काराला उत्तर देताना मी फक्त ‘नाही रे’ वर्गासाठी काम केले. ज्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत त्यांच्यासाठी काम केले, असे सांगत समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व म्हणजे रिपब्लिकन हा त्या जातीचा, धर्माचा, समूहाचा म्हणून न बघता रिपब्लिकन विचार म्हणून बघावे, असे मत व्यक्त केले.
सध्या गुवाहाटी ते मुंबई सगळा गाढवांचा गोंधळ सुरू आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. सबनीस यांनी व्यक्त केले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शाहू-फुले आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी केले होते. यावेळी अंकल सोनवणे, दादासाहेब कांबळे, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त अरविंद पाटील यांची उपस्थिती होती.