*युवक काँग्रेसने चायनीज स्टॉल चालवून*
*साजरा केला राष्ट्रीय बेरोजगार दिवस*
पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे १७ सप्टेंबर हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी समाजातील बेरोजगारीची भीषण स्थिती दाखवण्यासाठी, तसेच याकडे लक्ष वेधण्यासाठी बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन चायनीज स्टॉल चालविण्यात आला. बेरोजगारी व महागाईविरोधी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास, महाराष्ट्राचे प्रभारी मितेंद्रसिंह, महाराष्ट्र प्रदेश वकाँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश विकास आबनावे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात अनोख्या पद्धतीने बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला.
देशात वाढत असलेली बेरोजगारी ही युवकांसाठी खूप मोठी समस्या बनत चाललेली आहे. देशातल्या तरुणांना चहा विकायलाही आता संधी उपलब्ध नाही. शिक्षित होऊनही आज कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत. देशात वाढत असलेली महागाई यामुळे तरुणांना आता तर बेरोजगारी भत्ताही मिळणे मुश्किल झाले आहे, असे प्रथमेश आबनावे यांनी नमूद केले.
——————
प्रथमेश आबनावे यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगार तरुणांनी चायनीज स्टॉल चालवत राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा केला.