*मुख्यमंत्री साहेब, जरा सिरियस व्हा !*
केवळ हारतुरे स्विकारणे, खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते, खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला
पुणे – वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे राज्यातील सुमारे अडिच ते तीन लाख तरुणांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तळेगाव येथील जागा वेदांता कंपनीने निश्चित केली होती. ती कशामुळे गेली याचे उत्तर राज्यातील सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल. केवळ खुर्चीमध्ये बसणे आणि हार-तुरे स्विकारणे म्हणजे सर्व काही मिळविले असे नसते तर त्या पदाची जबाबदारी देखील घ्यावी लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता सिरियस होण्याची गरज आहे, असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुनावले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी वेदांता-फॉक्सकॉन कंपनी राज्याबाहेर गेल्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी *‘महाराष्ट्र को क्या मिला, लॉलीपॉप लॉलीपॉप’ * अशा जोरदार घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टिकेची तोफ डागली. त्या म्हणाल्या की, वेदांता व फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ अशा प्रकारचे लॉलीपॉप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.केंद्र आणि राज्य सरकार केवळ जनतेस लॉलीपॉप दाखवत असून कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात येत नाही. लहान मुलांना ज्या प्रकारे समजूत काढण्यासाठी आश्वासन दिले जाते तसेच लॉलीपॉप सरकार जनतेस देत आहे. राज्याच्या हितासाठी सरकारने काम करणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारमध्ये गुजरातमधील वजनदार नेते असून आगामी गुजरात विधानसभा निवणुकीपूर्वी मताचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी वेदांता प्रकल्प हलविण्यात आला आहे.
यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, महाराष्ट्रातला हक्काचा वेदांत ग्रुपचा प्रकल्प गुजरात मध्ये गेलेला आहे. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात रोजगार यावा यादृष्टीने प्रयत्न करताना दिसत नाही. केंद्र सरकारशी चांगला संवाद असल्याचे सांगणारे सत्ताधारी प्रत्यक्षात मात्र रोजगार आणण्यात अपयशी ठरले आहेत. गुजरात देखील भारताचेच एक राज्य आहे . तेथील जनता देखील आपलीच आहे. पण केंद्रातील सत्ताधारी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला पाण्यात बघत असून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातून अनेक महत्वाची कार्यालये आणि प्रकल्प गुजरातला हलविण्यात आले असून यामागे विशिष्ट शक्ती किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर अदृश्य शक्तीशाली हात आहे. मुख्यमंत्री हे अतिशय स्वाभिमानी आहेत असे आम्हाला सांगितले जाते.त्यांनी आपला स्वाभिमानी मराठी बाणा जागृत करुन केंद्र सरकारला या कृत्याचा जाब विचारावा आणि हा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही देशमुख यांनी दिला.
यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख, राजू साने , प्रदीप गायकवाड , महेश शिंदे , बाळासाहेब आहेर , सौ.सरीता काळे , कार्तीक थोटे , सौ.जयश्री त्रिभुवन .सौ.धनश्री कराळे सौ.निता गायकवाड, राजू खांदवे , सौ मंजुश्री गव्हाने व इतर प्रमुख मोठेया संख्येने उपस्थित होते.