Friday, March 14, 2025

माधव भांडारी लिखित “डाव्यांचा खरा चेहरा” या पुस्तकाचे प्रकाशन

माधव भांडारी लिखित “डाव्यांचा खरा चेहरा” या पुस्तकाचे प्रकाशन

नक्षलवाद हा डाव्यांचा विघटनवादी उग्र चेहरा
– प्रविण दीक्षित, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य

पुणेः- शेतकरी, कामगार, दलित, अल्पसंख्य आणि गरिबांच्या नावाने आणि त्यांच्या खऱ्या-खोट्या मागण्यांचे आपणच प्रवक्ते आहोत, असा कांगावा करीत आपला खरा चेहरा लपवायचा आणि हिंसाचार करायचा ही डाव्यांची वस्तूस्थिती आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या राज्यांचा त्यासाठी त्यांनी प्रयोगशाळा म्हणून वापर केला. नक्षलवाद हा डाव्यांचा विघटनवादी उग्र चेहरा आहे, असे मत राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते माधव भांडारी लिखित “डाव्यांचा खरा चेहरा” या पुस्तकाचे प्रकाशन आज राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

विवेक विचार मंच, महाराष्ट्र, लोकशाही जागर मंच, पुणे आणि राजे शिवराय प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार आणि विवेक विचार मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत आणि लेखक माधव भांडारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रविण दीक्षित म्हणाले की, विश्वासघात हाच त्यांचा उद्योग असून डाव्यांच्या भ्रष्टाचाराचे वास्तव, विरोधाचे केवळ ढोंग, बौद्धिक क्षेत्रातही भ्रष्टाचार यावर लेखकाने या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. डावे हे खोटारडे असून टोकाची असहिष्णूता आणि कंपूशाही करणारी जमात आहे. सगळे सारखे आहेत, यासारखी आकर्षक वाटणारी वाक्ये वापरून सामान्य लोकांना फसवायचे आणि प्रत्यक्षात स्वतःचे हीत साधून घ्यायचे, असे हे ढोंगीपणा करणारे डावे आहेत. रशिया आणि चीनला डोळ्यासमोर ठेवत भारतातील त्यांचे अनुयायी स्वतःला डावे म्हणवत भारतातही असाच भ्रष्टाचार आणि हिंसाचार घडवून आणू इच्छित आहेत.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रदीप रावत म्हणाले की, भारतातच राहून भारताच्या सरकारविरूद्ध डाव्यांनी पुकारलेले हे युद्ध आहे. शेवटचा मनुष्य शस्त्र खाली ठेवेपर्यंत मोहिमा आखून लष्कराच्या मदतीने हा बिमो़ड करणे आवश्यक आहे. डावी विचारसरणी हा देशाच्या पोटात झालेला कर्करोग असून देशाच्या सार्वभौमत्वापुढील मोठे आव्हान आहे. प्राधान्य क्रमाने या कर्करोगाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे. धोरणात्मक पातळीवर सरकारला अडचणीत आणून प्रगातीच्या मार्गात अडथळे आणायचे, ही त्यांची मानसिकता आहे. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडल्यानंतर कम्युनिझम नाकारला होता. स्वातंत्र्याचा बळी देऊन मिळणारी समता आंबेडकरांंनी नाकारली होती. सहिष्णू समाज आणि लोकशाही कार्यप्रणाली उलथवून लावायची, हे डाव्यांचे अंतिम ध्येय असून यासाठी त्यांनी बंदुका देखील हाती घेतल्या आहेत. बुद्धीभ्रम तयार करून डावे कावा साधत आहेत. डाव्यांशी अनेक आघाड्यांवर लढण्यासाठी समाजात वैचारिक जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

यावेळी लेखक माधव भांडारी यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली.

– ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते माधव भांडारी लिखित “डाव्यांचा खरा चेहरा” या पुस्तकाचे प्रकाशन करताना राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित. यावेळी (डावीकडून) प्रदीप रावत, दीक्षित आणि भांडारी.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles