*महिला डॉक्टरांच्या चॅरिटी फॅशन शो मधून दुर्गम भागातील एक लाख महिलांना देणार सॅनिटरी नॅपकिन्स व मुलींना एचपीव्ही लसीकरण देणार मोफत*
पुणे : अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटलेले आहे. पाच – सहा वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला – पुरुषांचेही फॅशन शो होत असतात. या सर्व फॅशन शो पेक्षा एक आगळा – वेगळा, सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स घेणार आहे. या ‘ग्लॅम डॉक’ चॅरिटी फॅशन शो मध्ये फक्त महिला डॉक्टरांचा समावेश असणार आहे, या चॅरिटी फॅशन शोच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून राज्याच्या दुर्गम भागातील एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत, अशी माहिती कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार यांच्यासह डॉ. राजश्री ठोके, डॉ. श्रद्धा जवंजाळ, डॉ. वर्षा एस. कुऱ्हाडे,डॉ कविता कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
फॅशन शो विषयी माहिती देताना योगेश पवार म्हणाले, आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स च्या वत्तीने हा ‘ग्लॅम डॉक’ फॅशन शो आयोजित केला आहे. यामध्ये फक्त महिला डॉक्टरांचा सहभाग असणार आहे. पुण्यात जुलै महिन्यात हा शो होणार असून यामध्ये संपूर्ण राज्यभरातून दीडशेहून अधिक महिला डॉक्टर सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या शोमध्ये दोन राऊंड होतील त्यातील पहिला राऊंड हा डिझायनर अर्थात फॅन्सी ड्रेस मध्ये असेल तर दूसरा राऊंड त्यांच्या व्हाईट एप्रॉन मध्ये होणार आहे. या फॅशन शो मधून जमा झालेल्या निधीतून दुर्गम भागातील एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत, यामुळे अधिकाधिक महिला डॉक्टरांनी यामध्ये सहभागी व्हावे, तसेच विविध हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज यांनी मदत करावी, असे आवाहन योगेश पवार यांनी केले आहे.
अलीकडच्या काळात अनेक महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध म्हणून एचपीव्ही लसीकरण केले जाते. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस (HPV) ही विशिष्ट प्रकारच्या मानवी पॅपिलोमाव्हायरसच्या संसर्गास प्रतिबंध करणारी लस आहेत. उपलब्ध HPV लस एकतर दोन, चार किंवा नऊ प्रकारच्या HPV पासून संरक्षण करतात. सर्व HPV लसी किमान HPV प्रकार 16 आणि 18 पासून संरक्षण करतात. डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्या वतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. 4000 रुपये किमतीची लस ही कशिश सोशल फाउंडेशन व पिंक रेवॉल्युशन च्या वतीने 9 ते 16 वयोगटातील महिलांना मोफत देण्यात येणार आहे. तसेच दुर्गम भागातील महिलांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी दुर्गम भागातील महिलांना एक लाख सॅनिटरी नॅपकिन्स देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
या सामाजिक उपक्रमांबद्दल डॉ. राजश्री ठोके म्हणाल्या, मी यापूर्वी विविध फॅशन शो मध्ये सहभाग नोंदवला, अनेक पारितोषिके जिंकली आहेत. आपण समाजाचे देणे लागतो, महिला आरोग्य जनजागृती करण्यासाठी योगेश पवार यांनी या फॅशन शो ची संकल्पना मांडली ती मला डॉक्टर म्हणून अतिशय महत्वाची वाटली यामुळे मी या संकल्पनेचा भाग बनले आहे.
डॉ. श्रद्धा जवंजाळ म्हणाल्या, महिलांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्याची गरज आहे. त्यातही ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांचे स्वच्छता, आरोग्य याकडे दुर्लक्ष होत असते. कशिश सोशल फाउंडेशनची दुर्गम भागातील महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्याची संकल्पना ही अत्यंत महत्वाची आहे, यामुळे या ‘ग्लॅम डॉक’ चॅरिटी फॅशन शो चा मी भाग झाले आहे.