*बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी नोकरभरतीसाठी काढला कँडल मार्च*
– विविध बँक संघटनांचा सहभाग; २०० पेक्षा अधिक दधिकारी-कर्मचारी रस्त्यावर
पुणे : उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी आवश्यक क्लार्क, ऑफिसर्स, सब-स्टाफ, अर्धवेळ सब-स्टाफची भरती करा, प्रशासकीय बदल्यांचे मनमानी व दडपशाहीचे धोरण बंद करा, ग्राहकांच्या, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, कामगार संघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न थांबवा, अशा विविध मागण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कँडल मार्च काढला. या कँडल मार्चमध्ये २०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले.
युनायटेड फोरम फॉर महाबँक युनियनच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ग्राउंडजवळील बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल ऑफिसपासून ते मुख्य कार्यालयाजवळील एकबोटे कॉलनीतील पोस्ट ऑफिसपर्यंत हा कँडल मार्च निघाला. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना आणि महाबँक नवनिर्माण सेना आदी कर्मचारी संघटना यात सहभागी झाल्या.
संघटनांचे प्रतिनिधी धनंजय कुलकर्णी, शैलेश टिळेकर, अनंत सावंत, राजीव ताम्हाणे, बी. कृष्णा, संतोष गदादे, विराज टिकेकर आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात निघालेल्या या कँडल मार्च द्वारे लवकरात लवकर नोकरीभरती करावी, अशी मागणी करण्यात आली.
धनंजय कुलकर्णी म्हणाले, “एकीकडे बँकेची उलाढाल, नफा वाढत आहेत. बँकिंग क्षेत्रात महाबँकेचे नाव उत्कृष्ट बँक म्हणून घेतले जाते. बँकेच्या या यशात प्रत्येक कर्मचाऱ्याचा मोलाचा वाटा आहे. खासगीकरण, कोरोनाची परिस्थिती यामुळे सर्वत्र अनिश्चितता असतानाही कर्मचारी चांगले काम करत आहेत. बँकेची उलाढाल, नव्या शाखा, नव्या योजना, सेवा बँकेने आणल्या, मात्र कर्मचाऱ्यांची भरती केली नाही. रिक्त जागाही भरल्या जात नाहीत. परिणामी, ग्राहकांना सेवा देताना कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतो. इच्छा असूनही, चांगली सेवा देण्यात कर्मचाऱ्यांवर मर्यादा येतात. त्यामुळे कर्मचारी भरती लवकरात लवकर व्हायला हवी.”
शैलेश टिळेकर म्हणाले, “या मागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याआधी निवेदन, ट्विटर मोर्चा काढला आहे. आज येथे कँडल मार्च काढला असून, याची दखल घेतली नाही, तर येत्या काळात तीव्र आंदोलन करणार आहोत. बदलीचे मनमानी धोरण राबवले जात असून, कर्मचारी संघटनांना विश्वासात न घेता निर्णय घेऊन ते लादले जात आहेत. या सगळ्याविरोधात आणि असंवेदनशील बँक व्यवस्थापनाला जागे करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट झाली आहे.”
——————–