Friday, November 8, 2024

प्रवासवर्णनपर लेखनाने मराठी साहित्याच्या समृद्धतेत भर*

*प्रवासवर्णनपर लेखनाने मराठी साहित्याच्या समृद्धतेत भर*
———————————————————–
*’इजिप्सी’मधून गूढ, अद्भुत इजिप्तची घडेल सफर*
———————————————————–
*ज्ञानलक्षी, प्रवासवर्णनपर साहित्याला वाचकांची मोठी मागणी*
प्रा. मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन; मनोविकास प्रकाशनातर्फे रवि वाळेकर लिखित ‘इजिप्सी’ ग्रंथाचे प्रकाशन

पुणे : “चरित्र, आत्मचरित्र, माहितीपर लेखन यासारख्या ज्ञानलक्षी व प्रवासवर्णनपर साहित्यकृतींना वाचकांची मोठी मागणी आहे. मध्यमवर्गीय माणसालाही आपण जग पाहायला हवे, अशी भावना गेल्या काही वर्षात रुजत आहे. प्रवास करतानाच लेखनाची कला विकसित होतेय, ही मराठी साहित्याच्या समृद्धतेत भर घालणारी गोष्ट आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

मनोविकास प्रकाशनातर्फे रवि वाळेकर लिखित ‘इजिप्सी : एका गूढ, अद्भुत सफर’ या ग्रंथाचे प्रकाशन प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या प्रकाशन सोहळ्यावेळी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, ‘मनोविकास’चे अरविंद पाटकर, वाळेकर यांच्या पत्नी शिल्पा उपस्थित होते. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ, तर गौरी खराडे यांनी ग्रंथाची मांडणी व सजावट केली आहे.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “पु. ल. देशपांडे, अनिल अवचट, मीना प्रभू यांसारख्या लेखकांनी प्रवासवर्णन या साहित्याला वेगळी ओळख दिली. स्थिती, गती आणि संस्कृतीची गुंफण असणारे हे प्रवासवर्णनपर साहित्य मराठी साहित्याला अधिक समृद्ध करत आहे. रवि वाळेकर हे या मालेतील एक सूर गवसलेले लेखक आहेत. उघड्या डोळ्यांनी जग पाहत, त्याचे अतिशय रसाळ, सहज, ओघवत्या, मिश्किल पण तितक्याच गांभीर्याने केलेले वर्णन वाचकाला गुंतवून ठेवते.

“वाळेकर यांच्या लेखनात सूक्ष्म निरीक्षण, विनोद बुद्धी आहेत. ते तात्कालिक न वाटता दीर्घकालीन असल्याचे जाणवते. ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती जोपासल्याशिवाय असे प्रभावी लेखन होत नाही. इजिप्तला आपण प्रत्यक्ष जाऊन यावे, ते आपल्या डोळ्यांनी पाहावे, इतक्या प्रभावीपणे त्याची मांडणी केली आहे. इजिप्शियन संस्कृती, समाज, शहरांची रचना, वारसास्थळे अशा विविधांगी गोष्टींची सफर वाळेकर ‘इजिप्सी’मधून घडवतात,” असे प्रा. मिलिंद जोशी म्हणाले.
दीपा देशमुख म्हणाल्या, “इजिप्सी हा ग्रंथ अतिशय रंजक आणि ओघवत्या शैलीत मांडला आहे. नियमित वाचक नसलेल्यांनाही वाचनाची गोडी लावणारा असा हा ग्रंथ आहे. वाळेकर यांनी इजिप्त देशाची सफर घडवली आहे. पुस्तक वाचल्यावर आपण आयुष्यात एकदा तरी इजिप्त पाहायला हवे, असे वाटते. गूढ आणि अद्भुत अविष्कार असणाऱ्या इजिप्तचा ‘इजिप्सी’ ग्रंथ हा एक महत्वाचा दस्तावेज झाला आहे.”

रवि वाळेकर म्हणाले, “पुस्तक घडविण्यात लेखक, मुखपृष्ठकार, प्रकाशक या सर्वांचे योगदान आहे. आपल्याला इजिप्तबद्दल मोजक्याच गोष्टी माहीत असतात. मकरंद अभ्यंकर यांच्याकडून इजिप्तला जाण्यापूर्वी मार्गदर्शन घेतले. रामायण, महाभारत काळापूर्वीचे वास्तू आजही सुस्थित असून ते आपल्याला बघता येतात. इजिप्त आजही जगाला अनभिज्ञ असून, त्याचा जितका उलगडा करू, तितका तो अधिक रंजक आहे.”

‘इजिप्सी’मधील लेखन अतिशयोक्ती नसून, वाचण्याची भूक निर्माण करणारी साहित्यकृती आहे. वाचकांचा चांगला प्रतिसाद ‘इजिप्सी’ ग्रंथाला मिळेल, अशी आशा अरविंद पाटकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. मंजिरी चौधरी-तिक्का यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
——————-
: *एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ : ‘इजिप्सी’ या ग्रंथाच्या प्रकाशनावेळी डावीकडून रवि वाळेकर, दीपा देशमुख, प्रा. मिलिंद जोशी व अरविंद पाटकर.*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles