*पुण्यात पहिल्यांदाच होणार संत महंतांचे भव्य संमेलन व दर्शन*
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; महंत, महामंडलेश्वर, मठाधिपती, नागा साधू यांची उपस्थिती
पुणे : महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान व मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक फाउंडेशनच्या पुढाकारातून महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पुणे शहरात भव्य संत संमेलन व दर्शन सोहळा होत आहे. हे संमेलन येत्या रविवारी (दि. ५ मार्च) वर्धमान सांस्कृतिक भवन, गंगाधाम चौक, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती गुरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संयोजक राहुल गोसावी, शिवाजी करंजुले, अतुल भोसले, नंदकिशोर शहाडे आदी उपस्थित होते.
प्रकाशभाऊ शिंदे म्हणाले, “या संत संमेलनात श्री शिवशक्ती कालिदास धाम संपाला हरियाणा येथील महंत श्री. श्री. श्री. १००८ कालिदास महाराज,पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंत्री श्री. श्री. श्री. १००८ अशोक महाराज, पंचदशनाम जुना आखाडा हरिद्वार येथील महामंडलेश्वर श्री. श्री. श्री. १००८ प्रेमगिरी महाराज, श्री. श्री. श्री. १००८ हरिगिरी महाराज, किन्नर जुना आखाड्याचे महामंडलेश्वर १००८ आचार्य लक्ष्मीनंद गिरी, महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्यासह अनेक मठाधिपती, ५०० नागा साधू, १५ वाचासिद्धी संत, महात्मे उपस्थित राहणार आहेत. मठाधिपती भवानीमाता (हरिद्वार), नाथजी महाराज (नर्मदा खंड, मध्यप्रदेश), गरीबदास महाराज (मोठा महादेव, मध्यप्रदेश), साई हबीब महाराज (हैद्राबाद), भारतजी महाराज (वाराणसी), वाईकर महाराज (सातारा), महेश स्वरस्वती महाराज (दत्तधाम, तुळजापूर), दिलीप बाबू गणोरकर (अमरावती) यांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.”
“या अभूतपूर्व सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय संसदीय मंडळाचे सत्यनारायण जाटिया, राष्ट्रीय सुरक्षा मंचाचे महामंत्री गोपाळ गुप्ता, आमदार भारत गोगावले, आमदार श्वेता महाले, आमदार भीमराव तापकीर, आमदार माधुरी मिसळ, आमदार चेतन तुपे, आमदार महेश लांडगे, भाजपच्या माथाडी कामगार आघाडीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांची उपस्थिती असणार आहे,” असे शिंदे म्हणाले.
या संत व महंत संमेलनात विश्वशांती महायज्ञ, सुमधुर सुंदरकांडाचे प्रस्तुतीकरण, भजन व प्रवचन, मुक्त भांडारा, गोमाता पूजन आदी कार्यक्रम होणार आहेत. हरिद्वारवरून आणलेल्या एक हजार लीटर गंगाजल मध्ये हा महाप्रसाद शिजवला जाणार आहे. यासह गुरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे निर्मित भारतातील एकमेव जागृत अकरा मारुती मठाचा आणि मठाधिपती पदाचा मुहूर्तमेढ सोहळा, मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक राष्ट्रीय फाउंडेशनचे लोकार्पण व संकेतस्थळाचे उद्घाटन, १० मुलांचे शैक्षणिक पालकत्व आणि ५१ अंध मुलांना शालेयपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अतुल नरहरी भोसले, राहुल गोसावी मित्र परिवार, महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान, सर्वात्मक महारुद्र परिवार, मैत्री प्रतिष्ठान, शशिकांत कांबळे, ललित तींडे, भरत मिसाळ, डॉ. इंद्रजित यादव, ऍड. महेंद्र दलालकर, निलेश आवटे, चिमाजी आहेर, पंकज महाले आदी परिश्रम घेत असल्याचे नंदकिशोर शहाडे यांनी सांगितले.
—————————-
पत्रकार भवन : पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून नंदकिशोर शहाडे, ललित तींडे, प्रकाशभाऊ शिंदे, राहुल गोसावी, शिवाजी करंजुले.