*दिव्यांगांच्या स्वरांनी जिंकली श्रोत्यांची मने*
– लायन्स क्लबच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांची समूहगीत स्पर्धा उत्साहात
पुणे: ‘हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे’, ‘झुक झुक आगीन गाडी’, ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’, ‘लाडक्या गणपती बाप्पांना साकडं’, ‘मनी नाय भाव अन देवा मला पाव’, ‘छडी लागे छम छम’, ‘टप टप थेंब वाजती’, ‘पाऊस आला रे पाऊस आला’, ‘साबुदाणा साबुदाणा, रोज खावा साबुदाणा’, ‘हे भोळ्या शंकरा’ अशी बालगीते, भजन, देशभक्तीपर गाणी, प्रार्थना, अभंग गोड व सुरेल आवाजात गात दिव्यांग विद्यार्थ्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.
सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांना गाता यावे, त्यांना आपल्या सुप्तगुणांना प्रकट करता यावे व त्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लायन्स क्लबच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समूहगीत स्पर्धेचे आयोजन केले होते. लायन्स क्लब ऑफ पूना वेस्टतर्फे दरवर्षी या समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी स्पर्धेत एकूण १५ शाळा व कार्यशाळा वर्ग सहभागी झाले होते. यावर्षी प्रथमच प्रौढ मतिमंदांचे दोन गट सहभागी झाले होते.
स्वरबंध या संगीत कार्यक्रमाचे संचालक धनंजय आपटे व कवयित्री अर्चना गौरकर हे या स्पर्धेचे परीक्षक होते. या कार्यक्रमास लायन्स क्लब प्राईमचे माजी प्रांतपाल राजकुमार राठोड, माजी प्रांतपाल आणि ट्वेन्टी फर्स्ट सेंचुरीचे चंद्रहास शेट्टी, झोन चेअरमन पल्लवी देशमुख, स्पर्धा प्रमुख सीमा दाबके, जीवन हेंद्रे, राजेंद्र शेवाळे, पल्लवी लामधडे, मंदाकिनी माळवदे, सतीश राजहंस, राणी अहलुवालिया, सुहास दाबके आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांकडून गाण्यासोबतच फलकाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील देण्यात आला. यामध्ये, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती वापरा, निर्माल्याचा झाडांसाठी खत म्हणून वापर करा, अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका असे प्रबोधनात्मक संदेश स्पर्धकांकडून देण्यात आले. यावेळी सेवासदनच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित विविध पंचवीस गाण्यांचे एकाचवेळी एकत्रितपणे उत्तम सादरीकरण केल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना साथ दिली आणि ‘भारत माता की जय’ अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या. या गीतासाठी योगेश शिंदे या विद्यार्थ्याने सुंदर तबला वादन केले. त्यासाठी त्याला पाहुण्यांकडून विशेष बक्षीस देण्यात आले. अतिशय सुरेख, लयबध्द पद्धतीने विद्यार्थी विविध गाण्यांचे सादरीकरण करत होते.
सीमा दाबके म्हणाल्या, “समूहगीत स्पर्धेचे हे बारावे वर्ष आहे. सर्वच शाळांमध्ये संगीताचे शिक्षक असतातच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होते मात्र त्यावरही मात करत विद्यार्थ्यांनी छान सादरीकरण केले. स्पर्धेतील सर्वच विद्यार्थ्यानी न डगमगता सुंदर आवाजात गाणी म्हटली. पुढच्या महिन्यात महाभोंडला, समुहनृत्य स्पर्धा, दिवाळी मेळा आणि बालदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिव्यांग विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि आम्ही पण काही करू शकतो हे सर्वांसमोर आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही दरवर्षी करतो.”
चंद्रहास शेट्टी, राजकुमार राठोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळा गटातून प्रथम क्रमांक सेवासदन दिव्यांग शाळा, कार्यशाळा गटातून माधुरी ओगले आणि पुनर्वसन केंद्र प्रौढ मतिमंदमधून जीवनज्योत या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक जीवनज्योत शाळा, तृतीय ब्रम्हदत्त शाळा निगडी, उत्तेजनार्थ साई संस्कार शाळा निगडी आणि कार्यशाळा द्वितीय क्रमांक सेवासदन, दिलासा एरंडवना, तृतीय क्रमांक साई संस्कार निगडी, उत्तेजनार्थ कामयानी गोखलेनगर व गुरुकृपा यांना विभागून देण्यात आले. पुनर्वसन केंद्र प्रौढ मतिमंद द्वितीय क्रमांक नवक्षितिज शाळेला मिळाला. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट च्या वतीने वस्तू भेट म्हणून देण्यात आली. प्रतिभा खंडागळे यांनी सूत्रसंचलन केले तर स्मिता देव यांनी उपस्थितांचे आभार मानले.