*घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गदारोळात*
पुणे : रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी प्रचंड गदारोळात पार पडली. व्यवस्थापकीय संचालक सुभाष शिंदे यांनी सभेचा अजेंडा वाचून दाखवला आणि त्यानंतर लगेच कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी सुरुवातीलाच भाषण करून सभा आटोपण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विरोधक व सभासदांकडून विद्यमान संचालक मंडळाच्या कारभाराबाबत प्रश्न विचारण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्षांनी आपले भाषण रेटून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभेत प्रचंड गदारोळ झाला आणि कोणत्याही चर्चेविना राष्ट्रगीत होऊन ही सभा संपली.
माजी संचालक ॲड. सुरेश पलांडे यांच्यासह ज्येष्ठ संचालक पांडुरंग थोरात, माजी व्हाईस चेअरमन दादापाटील फराटे, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर फराटे, मांडवगण विकास सोसायटी चेअरमन गोविंद तात्या फराटे, ज्येष्ठ नेते सुरेशराव थोरात, पांडूरंग दुर्गेसाहेब, महेश ढमढेरे यांच्यांसह सभासद शेतकऱ्यांनी आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, गदारोळात एकाचीही मुद्यावर चर्चा झाली नाही.
ॲड. सुरेश पलांडे म्हणाले, “कारखान्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस असूनही, गाळप दिवसेंदिवस कमी होत आहे. तोटा २१ कोटींच्या वर गेला आहे. चांगल्या स्थितीतील कारखाना पवार यांच्या स्वार्थीपणामुळे अडचणीत आला आहे. वजनात काटा मारला जातो, शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले नाहीत, कामगारांचे पगार दिले जात नाहीत, या सगळ्या प्रश्नांचा जाब आम्ही सर्वसाधारण सभेत विचारत होतो. आम्ही अध्यक्षांना सांगत होतो की, तुम्ही आधी सभासदांचे प्रश्न, अडचणी मांडू द्या आणि मग भाषण करा. मात्र, अध्यक्षांनी एकही प्रश्न विचारू दिला नाही. त्यामुळे सभासदांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याचा फायदा घेत अध्यक्षांनी सभा आटोपती घेतली. सभा गुंडाल्यामुळे ऑनलाईनवजनकाटा आणि ऑनलाईन खरेदी-विक्री बाबतचे ठराव करायचे राहून गेले.”
अशोक पवार म्हणाले, “एकाही सभासदाची एफआरपीच्या संदर्भात तक्रार आलेली नाही. सभासदांनी दाखवलेल्या सामंजस्याबद्दल आभार मानतो. विरोधकांनी राजकारण करत सभेत गोंधळ घातला. इतर कारखान्यांच्या तुलनेत बॉयलर क्षमता कमी असल्याने आपल्याला सहवीजनिर्मिती करण्यात अडचणी आल्या. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वीजनिर्मिती होऊनही त्यातून पैसे मिळाले नाहीत. परिणामी त्यातून कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कोजनमुळे जवळपास १६ कोटींचा तोटा झाला आहे. आजी-माजी संचालकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.”