*’कोकण कन्या’च्या सुरावटींना पुणेकर रसिकांची दाद*
पुणे : जुन्या-हिंदी मराठी, भावगीतांच्या गायनातून उमटलेल्या सुरावटींनी पुणेकर रसिकांची दाद मिळवली. प्रसिद्ध कोकण कन्या बँडच्या पंचकन्यांनी बहारदार गायन करत रसिकांना मंत्रमुग्ध करतानाच थिरकायलाही लावले. निमित्त होते, वाघोली येथील जीएच रायसोनी इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित कोकण कन्या बँडच्या संगीत मैफलीचे! सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात नुकतीच ही मैफल रंगली.
‘आज जाने की जिद ना करो’, ‘लग जा गले,’ अशा जुन्या बहारदार, तर ‘ओ राधा तेरी चुनरी’, ‘दिल धडकाये सिटी बजाए’ अशा नव्या दमाच्या गीतांचे सादरीकरण कलाकारांनी केले. कोकण कन्या बँन्ड हा केवळ मुलींचा चमू असून, त्यातील अरुंधती तेंडुलकर, रसिका बोरकर, स्नेहा आखरे, आरती सत्यपाल, दुहिता कुंकवलेकर, निकिता घाटे या कलाकारांनी रसिकांची मने जिंकली. संगीतकार रविराज कोलथकर यांनी काव्य किरणांची प्रभात रंगवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने कार्यक्रमाचा समारोप झाला.
‘रायसोनी’चे चेअरमन सुनील रायसोनी, प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, उपप्राचार्य डॉ. वैभव हेंद्रे, अधिष्ठाता डॉ. दिनकर यादव यांच्यासह सर्व विभागप्रमुखानी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. वैभव हेंद्रे, डॉ. नागनाथ हुले, डॉ. सुरेश धारणे, किरण कोरडे, प्रथमेश केसकर यांनी मैफलीचे सादरीकरण करणाऱ्या कलावंताना सन्मानित केले. आभार डॉ. प्रवीण जांगडे यांनी मानले.