*केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते अभिनेते सयाजी शिंदे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार’ होणार प्रदान*
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील उत्तुंग योगदान आणि सामाजिक कार्य लक्षात घेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीच्या वतीने ‘समर्पण पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. यंदाचा पहिला समर्पण पुरस्कार संवेदनशील अभिनेते सयाजी शिंदे यांना जाहीर झाला असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीचे राजेश पांडे, ॲड. मंदार जोशी,बाळासाहेब जानराव, सुनील महाजन, मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान सोहळ्या विषयी माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सयाजी शिंदे पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या पर्यावरण विषयक कार्यासाठी आम्ही त्यांना पहिला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार’ प्रदान करत आहोत. १ लाख ११ हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण २३ एप्रिल २०२३ रोजी लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय येथे सायंकाळी ५ वा. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे राहणार आहेत, तसेच यावेळी मिलिंद कुलकर्णी अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.