Marathi news

ओशो संबोधी दिनानिमित्त ओशो शिष्यांची संगीत ध्यानधारणा

ओशो संबोधी दिनानिमित्त ओशो शिष्यांची संगीत ध्यानधारणा

पुणे : आचार्य रजनीश ओशो यांच्या शिष्यांनी संगीत ध्यानसाधना करत ७० वा ओशो संबोधी दिन साजरा केला. मंगळवारी (दि. २१) असलेल्या ओशो संबोधी दिवसानिमित्त अल्पबचत भवन येथे जगभरातून दोन ते अडीच हजार ओशो शिष्य दाखल झाले आहेत. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना गळ्यात ओशोंची माला घालून आश्रमात प्रवेश नाकारल्यामुळे तसेच ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरमध्ये ओशो जयंती, ओशो महापरिनिर्वाण, गुरुपौर्णिमा, ओशो संबोधी दिवस असे कुठल्याही प्रकारचे उत्सव साजरे केले जात नाहीत. त्यामुळे ओशोंच्या शिष्यांनी एकत्र येऊन अल्पबचत भवन येथे संबोधी दिवस साजरा केला.

यावेळी बोलताना स्वामी चैतन्य कीर्ती म्हणाले, ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना ओशोप्रेमींना गळ्यामध्ये माळा घालून आश्रमात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. आश्रमाची जागा विकण्यासाठी काढली आहे. या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. उद्या मंगळवारी ओशोची दीक्षा माळा घालून आश्रमात प्रवेश करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अतिशय शांततापूर्ण मार्गाने आम्ही आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन करत आहोत. पोलिस व स्थानिक प्रशासनाकडून कोरेगाव पार्क यातील ओशो आश्रम परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तरीही ओशो शिष्य शांततापूर्ण मार्गाने आश्रमात जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. ओशोंची दीक्षा माळा हा आमचा अधिकार आहे आणि ओशोंची दीक्षा माळा घालूनच आम्हाला आश्रमात प्रवेश दिला जावा, समाधीचे दर्शन घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button