*आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेत महाराष्ट्रातील* *चार खेळाडू करणार भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व

0
155

*आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेत महाराष्ट्रातील*
*चार खेळाडू करणार भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व*

– क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह विविध देशांच्या मंत्र्यांच्या हस्ते २६ नोव्हेंबरला होणार उद्घाटन
– जगदीश टायटलर व ॲड. स्मिता निकम यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे : कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने २३ ते २८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होऊ घातलेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एकूण ६५ देशांतून ५०० पेक्षा अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. भारतीय संघात महाराष्ट्रातून चार खेळाडूंचा समावेश झाला असून, आदित्य धोपगावकर (अहमदनगर), गौतमी कांचन (पुणे), स्नेहल खावरे (पुणे), गणेश लांडगे (अहमदनगर) हे महाराष्ट्रातील चौघे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा इंटरनॅशनल कुराश असोसिएशन व ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यतेने होत असून, भारत देशात कुराश इंटरनॅशनल चॅम्पियनशिप आयोजन करण्याची ही चौथी वेळ आहे.

कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे चीफ पॅट्रोन जगदीश टायटलर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश पोपली, सचिव लालसिंग, खजिनदार धर्मेंद्र मल्होत्रा, कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र पॅट्रोन आणि स्पर्धेच्या प्रमुख संयोजिका ॲड. स्मिताताई निकम, कुराश महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश नगरे, संतोष चोरमुले, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे शिवाजी साळुंखे, वन की इव्हेंट्स अँड ओके सर सिक्युरिटी अँड बाउंसर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड. स्मिताताई निकम म्हणाल्या, “कुराश हा हजारो वर्षांपासून प्रचलित असलेला दोन स्पर्धकांतील युद्धकलेचा प्रकार आहे. स्त्री व पुरुष अशा दोन्ही गटात, विविध वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी विविध देशाचे क्रीडामंत्री, तसेच उच्चाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच समारोपाला माजी खासदार उदयनराजे भोसले, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, भारतीय क्रीडा प्रशासक राजा रणधीर सिंग आदी उपस्थित राहणार आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here